तुझ्या प्रेरणेने,दिशा मुक्त दही
भयातून मुक्ती,मिळाली जनांना
गुलामी कुणाला कुणाचीच नाही
नसे दु:ख कोणा,नसे न्यून कोणा
फुलांना मुलांना,नसे दैन काही
जिजा माऊली गे......
जशी पार्वती,ती प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे,शहजीस तुही
जसा संविभागी,बळी पूर्वकाळी
शिवाजी जनांच्या,तसे चित्तदेही
जिजा माऊली गे.....
तुझ्या संस्कृतीने,तुझ्या जागृतीन
प्रकाशात न्हाती,मने हि प्रवाही
तुला वंदिताना,सुखी अंग अंग
खरा धर्म आता,शिवाचाच पाही.....
जिजा माऊली गे..
जयजिजाऊ!जय शिवराय!
जय जिजाऊ......!
राजमाता, स्वराज्यमाता, राष्ट्रमाता,लोकमाता जिजाऊ मा साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ मा साहेबांचे नाव घेताच त्यांचे कार्य आठवते; आणि त्यांच्या चरणी मन हजारदा लोटांगण घेत राहते. इतिहास आम्हाला त्यांच्या नितीसाम्पन,महत्वाकांक्षी, परिवर्तनवादी,कर्तव्यदक्ष, त्यागी ,न्यायनिष्ठुर ,समतावादी ,दूरदृष्टी ,करारी ,धाडसी ,पराक्रमी इत्यादी दुर्मिळ गुणांची साक्ष देत आहे; त्यांच्या श्रेष्ठ कर्तुत्वाची ग्वाही देत आहे. या सर्व गुणांना आठवत असतांना त्यांच्या महत्वाकांक्षी,परिवर्तनवादी, आदर्षमाता, आदर्श गुरु या गुणांचा प्रामुख्याने व मुद्दाम उल्लेख करत आहे. या मागचे कारण आजच्या सर्वच माता-पित्यांना,भाव-भगिनींना त्यातून स्फूर्ती घेवून ती स्फूर्ती आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कारणी लावावी हीच एकमेव अपेक्षा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतीकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही,की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या व्यक्तीला हे जागतिक आढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या मत -व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छात्रापातीपदापर्यंत पोहचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच शिवमाता-राजमाता-राष्ट्रमाता-जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजेच शिवचरित्र. 'शिवबा, अफझलखानच्या भेटीप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करेन.' हा दृढनिर्धार मेंदूत सतत जागृत ठेवणारी जिजाऊ! जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षांपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ!